गणितात तुम्हांला रस असेल, तर गणित एक गंमत असते. या विषयात काही मजेदार अंकही आहेत. हॅपी नंबर, आर्मस्ट्राँग नंबर, ड्यूडने नंबर.. यादी आणखी थोडी मोठी आहे. या यादीत दोन भारतीय नव्हे, तर महाराष्ट्राशी संबंधित नावं पण आहेत. एक आहे काप्रेकर अंक आणि दुसरं आहे काप्रेकर कॉन्स्टंट किंवा स्थिरांक!! कुणी काप्रेकर इतके प्रसिद्ध असतील असं वाटलं नव्हतं ना? सर्वसामान्यांना नाही, पण गणिताशी संबंधित लोकांना ते चांगलेच माहित आहेत. चला तर मग आज जाणून घेऊया या काप्रेकर स्थिरांक आणि त्या संख्येच्या जादूबद्दल. हा स्थिरांक आहे ६१७४!!
आपले मराठमोळे गणितज्ञ दत्तात्रय रामचंद्र काप्रेकर यांचा आवडता छंद म्हणजे आकडेमोड करणे!!! याच त्यांच्या आवडीने त्यांची ओळख ६१७४ या रहस्यमयी आकड्याशी झाली. या संख्येने जगभरातल्या गणितज्ञांची झोप उडवली आहे. तेही एकदोन दिवस नाही, तर ही संख्या तब्बल १९४९ पासून एक रहस्य बनून राहिला आहे.








