काही दिवसांपूर्वी १८ हजार कोटी रुपयांच्या संपत्तीचा मालक असूनही एका खेड्यात राहून मुलांची शिकवणी घेणाऱ्या तामिळनाडूतल्या उद्योजकाची गोष्ट वायरल झाली होती. श्रीधर वेम्बू हे त्यांचे नाव!
झोहो कॉर्पोरेशन या आयटी कंपनीचे ते संस्थापक आहेत. तामिळनाडूच्या एका खेड्यातून शिकून त्यांनी सिलिकॉन व्हॅलीत आयटी कंपनी थाटली. एवढ्या मोठ्या कंपनीचे मालक असूनदेखील ते लॉकडाऊनमध्ये तमिळनाडू येथील लहान मुलांना शिकविताना दिसत होते. ज्यामुळे त्यांची चर्चा देशभर झाली. आता या श्रीधर वेम्बू यांचा गौरव भारत सरकारने देखील केला आहे. त्यांना पद्मश्री हा देशातल्या सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक समजला जाणारा पुरस्कार मिळाला आहे. सरकारी शाळेत शिकून मोठ्या झालेल्या उद्योजकाचा हा सन्मान निश्चितच इतरांना देखील प्रेरणा देणारा आहे.






