इंडियन प्रीमियर लीग २०२२ स्पर्धेला (Indian Premiere League) जोरदार प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेपूर्वी झालेल्या लिलावात अनेक युवा खेळाडूंवर कोट्यावधींची बोली लावण्यात आली होती. तर काही दिग्गज खेळाडू होते, ज्यांना एकही संघाने आपल्या संघात स्थान दिले नाही. त्यापैकीच एक खेळाडू म्हणजे भारतीय संघातील वरिष्ठ गोलंदाज ईशांत शर्मा. गतवर्षी झालेल्या आयपीएल स्पर्धेत त्याने दिल्ली कॅपिटल्स संघाचे प्रतिनिधित्व केले होते. परंतु यंदा त्याला एकही खरिदरार न मिळाल्याने त्याचे चाहते भलतेच निराश झाले होते. दरम्यान बुधवारी (३० मार्च) झालेल्या सामन्यात त्याची झलक चाहत्यांना पाहायला मिळाली आहे.
आयपीएल स्पर्धेत नेहमीच काहीतरी हटके पाहायला मिळत असतं, यावेळी देखील काही चाहत्यांना मोठ्या स्क्रीनवर दाखवण्यात येत आहे. दरम्यान बुधवारी (३० मार्च) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळाला. हा सामना सुरू असताना ईशांत शर्मा व्हर्चुअल गेस्ट म्हणून दिसून आला होता. मोठ्या स्क्रीनवरील त्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
नेहमीच मैदानावर आपल्या वेगवान आणि उंच उसळी घेणाऱ्या चेंडूंनी फलंदाजांना अडचणीत टाकणारा ईशांत शर्मा सध्या घरबसल्या आयपीएल सामन्यांचा आनंद घेत आहे. हे पाहून नक्कीच त्याचे चाहते निराश झाले असणार. एकेकाळी रिकी पाँटिंग आणि हॅडिन सारख्या फलंदाजांना आपल्या तालावर नाचवणाऱ्या गोलंदाजाची ही अवस्था पाहून चाहत्यांनी सोशल मीडियावर ट्विट करायला सुरुवात केली आहे. आयपीएल २०२२ स्पर्धेसाठी झालेल्या लिलावात त्याची मुळ किंमत १.५ कोटी रुपये होती. परंतु कुठल्याही संघाने त्याला आपल्या संघात स्थान देण्यात रुची दाखवली नाही. यावेळी देखील युवा खेळाडूंवर कोट्यावधींची बोली लागली.
आयपीएल स्पर्धेतील प्रत्येक सामन्यात प्रायोजकांकडून निवडलेले काही खास पाहुणे मोठ्या स्क्रीनवर दाखवले जातात. या सामन्यासाठी देखील ईशांत शर्मा सह आणखी काही चाहत्यांची निवड करण्यात आली होती. ईशांत शर्माने आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत कोलकाता नाईट रायडर्स, डेक्कन चार्जर्स, सनरायझर्स हैदराबाद, पुणे वॉरियर्स इंडिया, किंग्ज इलेव्हन पंजाब आणि दिल्ली कॅपिटल्स संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.




