रसलच्या वादळी खेळी समोर पंजाबचे किंग्ज पडले फिके, ६ गडी राखून मिळवला जोरदार विजय

रसलच्या वादळी खेळी समोर पंजाबचे किंग्ज पडले फिके, ६ गडी राखून मिळवला जोरदार विजय

शुक्रवारी( १ एप्रिल) आयपीएल २०२२ स्पर्धेत रोमांचक सामना पार पडला. या सामन्यात पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स हे दोन्ही बलाढ्य संघ आमने सामने होते. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाचा विस्फोटक फलंदाज आंद्रे रसलच्या फटकेबाजीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्स संघाने ६ गडी राखून जोरदार विजय मिळवला. आंद्रे रसलने अवघ्या ३१ चेंडूंमध्ये तुफानी ७० धावांचे योगदान दिले. यासह कोलकाता नाईट रायडर्स संघ आयपीएल स्पर्धेच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचला आहे.

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, कोलकाता नाईट रायडर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या पंजाब किंग्ज संघातील सलामीवीर फलंदाजांना चांगली सुरुवात करून देता आली नाही. मयांक अगरवाल १ तर शिखर धवन अवघ्या १६ धावा करत माघारी परतला. पंजाब किंग्ज संघाकडून भानुका राजपक्षेने सर्वाधिक ३१ तर कगीसो रबाडाने २५ धावांचे बहुमूल्य योगदान दिले. पंजाब किंग्ज संघाचा संपूर्ण डाव १८.२ षटकात १३७ धावांवर संपुष्टात आला होता.

या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या कोलकाता नाईट रायडर्स संघातील सलामीवीर फलंदाजांना देखील चांगली सुरुवात करून देता आली नव्हती. वेंकटेश अय्यर ३ तर अजिंक्य रहाणेने अवघ्या १२ धावा करत पॅव्हेलियन गाठले. तर कर्णधार श्रेयस अय्यरने २६ आणि सॅम बिलिंग्सने नाबाद २४ धावा केल्या. शेवटी आंद्रे रसलने २ चौकार आणि ८ षटकार खेचत तुफानी ७० धावांची खेळी केली. हा सामना कोलकाता नाईट रायडर्स संघाने ६ गडी आणि ३३ चेंडू शिल्लक ठेऊन आपल्या नावावर केला.

टॅग्स:

IPL

संबंधित लेख