इंटरनेट आणि सोशल मिडीयाच्या जमान्यात अनेकांनी आपल्यातील कलागुणाचा योग्य वापर करून प्रसिद्धी मिळवली. आता उदाहरण द्यायचेच झाले तर राणू मंडलचेच बघा ना. कुणी तरी तिचा रेल्वेच्या डब्यात गातानाचा व्हिडीओ शूट केला आणि सोशल मिडीयावर अपलोड केला. या अनपेक्षित कृत्याने राणू मंडलचे नशीबच पालटून गेले. राणूला चक्क चित्रपटात गायची संधी मिळाली. एक व्हिडीओ अपलोड करणं किती साधी गोष्ट पण, त्याची ताकद किती मोठी आहे हे या एकाच उदाहरणावरुन लक्षात येते.
आता राणू मंडलची आठवण होण्याचे कारण म्हणजे, राणू प्रमाणेच बिहारच्या एका मुलाचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर जोरात व्हायरल होतो आहे. ‘बचपन का प्यार मेरा भूल नहीं जाना रे,’ अशा ओळी असलेले हे गाणे एका शाळकरी मुलाने गायले आहे. दोन वर्षापूर्वीच हा व्हिडीओ @Patanahd नावाच्या इंस्टा पेजवर शेअर झाला होता. आज त्या व्हिडीओला कोट्यावधी व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांच्या बालपणीच्या रम्य आठवणींना यामुळे उजाळा मिळाला असेल.
चित्रपट तारेतारकांनी देखील याची चांगलीच दखल घेतली आहे. कॉमेडीयन भारतीपासून रॅपर बादशाहनेही या गाण्याला एक मस्त ट्वीस्ट देऊन गायले आहे आणि आपल्या अकाऊंटवर शेअर केले आहे. अनेकांनी याच व्हिडीओपासून प्रेरणा घेऊन शॉर्ट व्हिडीओ आणि रिल्स व्हिडीओही बनवले आहेत.
आता प्रश्न पडतो हा मुलगा आहे कोण?
इंटरनेट सेन्सेशन बनलेल्या छोट्या मुलाचे नाव आहे, सहदेव सांग. सहदेवच्या या व्हिडीओमध्ये बॅकग्राउंडला एक फळा दिसतो आहे, त्यामुळे अनेकांचा असा अंदाज आहे की हा व्हिडीओ शाळेत शूट करण्यात आला असावा. यात मध्ये मध्ये तो गाण्याचे शब्द विसरतो तेव्हा कुणीतरी त्याला मागून त्याची आठवण करुन देत आहे.
आजघडीला या व्हिडीओला ५० लाख लाइक्स आणि १ कोटी व्ह्यूज आले आहेत. यावरुनच या व्हिडीओच्या लोकप्रियतेचा तुम्ही अंदाज लावू शकता.





